पुणे : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही दीर्घ चौकशी करण्यात आली असून, बँक व्यवहारांशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडींनंतर तब्बल 28 दिवसांनी रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी बीडमधून आलेल्या निनावी पत्राची सखोल चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी केली. कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ एका पत्राच्या आधारे आपल्यावर आरोप लावले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
चाकणकर यांनी म्हटले की, राज्यात यापूर्वी अनेक आरोप झाले, मात्र त्यावेळी पुरावेही समोर आले होते. सध्याच्या प्रकरणात मात्र केवळ अंदाज, अफवा आणि अप्रमाणित माहितीच्या आधारे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर आरोप होत आहेत. आरोप करणाऱ्यांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, तसेच माध्यमांनीही त्याची मागणी केली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
निनावी पत्र कोणाकडून आणि कशा प्रकारे संबंधितांपर्यंत पोहोचले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने हे पत्र पुढे आणले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनानेही अशा निनावी पत्रांना कायदेशीर महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.
तपास प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून आपण आतापर्यंत माध्यमांसमोर भूमिका मांडली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणात कोणत्याही आर्थिक किंवा जमीन व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा पुनरुच्चार करत, अखेरीस सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.