सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 विश्लेषण

राज्यात उष्णतेचा कहर वाढणार; पुढील चार दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा, 18-19 एप्रिलला पावसाची शक्यता

डिजिटल पुणे    15-04-2026 16:37:08

पुणे: राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून, येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः 17 एप्रिल हा महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरू शकतो. सध्या अकोला येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, इतर जिल्ह्यांमध्येही तापमान वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. पुण्यासह अनेक शहरांमध्ये उकाडा जाणवणार आहे. मात्र, 18 आणि 19 एप्रिल रोजी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळू शकतो.

या जिल्ह्यांमध्ये ‘हीटवेव्ह’चा इशारा

16 एप्रिल रोजी सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, परभणी, जालना, अकोला, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

17 एप्रिल रोजी जळगाव, अहिल्यानगर, बुलढाणा, बीड, सातारा, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर यांसह अनेक जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.

18 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसह सोलापूर जिल्ह्यातही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.

उष्णतेपासून बचावासाठी उपाय

तज्ञांच्या मते, या काळात पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी घ्यावे. उन्हात बाहेर पडताना डोके झाकणे, हलके सुती कपडे घालणे आणि थेट सूर्यप्रकाश टाळणे आवश्यक आहे. तसेच टरबूज, काकडी, द्राक्षे यांसारख्या पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा.ओआरएस, ताक, लिंबूपाणी किंवा पन्हे यांसारखी पेये शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतात. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, पंखे किंवा ओल्या कापडांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

काय टाळाल?

दारू, कॅफिनयुक्त पेये किंवा जास्त साखर असलेले ड्रिंक्स टाळावेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. तसेच जड, गडद रंगाचे कपडे घालणे आणि उन्हात जास्त कष्टाचे काम करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती