नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यशासह करुणेचा भाव जपल्यास तुम्ही एक उत्तम व्यक्तीही होऊ शकाल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षान्त समारंभ आज संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपले हे विचार मांडले. या समारंभात राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॅा. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित वैद्यकीय विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्र हा केवळ एक व्यवसाय नसून संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा एक मार्गही आहे. एक वैद्यकीय चिकित्सक केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर तो आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा संचारही निर्माण करतो. चिकित्सकाचा सहानुभूतीचा सल्ला केवळ आजारी व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही आधार देतो. अनेकदा डॉक्टरांसमोर कठीण परिस्थिती निर्माण होते. मात्र, अशा परिस्थितीतही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशील राहणे आवश्यक आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील आरोग्य कर्मचाऱ्यांशी नेहमी सन्मानाने वागायला हवे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्लाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी दिला.
आरोग्य सेवा क्षेत्र सातत्याने बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून पुढे वाटचाल केली पाहिजे. तंत्रज्ञान विकासाचा उपयोग ग्रामीण आणि शहरी भागांतील आरोग्य सुविधांची दरी कमी करण्यासाठी आणि सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या दशकभरात केंद्र सरकारने आरोग्य सेवांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाची पावले टाकली आहेत. ‘आयुष्मान भारत योजना, ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ची स्थापना, डिजिटल हेल्थ मिशन, लसीकरण कार्यक्रमांचा विस्तार, गंभीर आजारांच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय टीबी निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबवले जात आहेत. लोकांना स्वस्त आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अमृत’ फार्मसी आणि जन औषधी केंद्र उघडण्यात आली आहेत, असा उल्लेखही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात केला.
एम्स आणि आरोग्य विद्यापीठात व्यापक सहकार्य हवे – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आणि कर्करोगासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. नैराश्य, चिंता आणि व्यसनाधीनतेसारख्या मानसिक आजारांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली असून आयुष्यमान भारत सारख्या योजनांमुळे लोक दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी शासकीय रुग्णालयांकडे वळत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी बोलताना केले.
राज्यपाल वर्मा म्हणाले, आरोग्य क्षेत्रात दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक, नागरी आणि धर्मदाय आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ या संस्थांमध्येही व्यापक सहकार्य होण्याची गरज आहे. त्यातून संसोधन, अनुभव व कौशल्यांची देवाणघेवाण तसेच एकूणच आरोग्यसेवा व्यवस्थेच्या बळकटीकरणाला चालना मिळू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पाच किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे. पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जगाला आज वैद्यकीय सेवेची गरज आहे. या संस्थेतून उत्तीर्ण होऊन भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपचाराबरोबरच करुणेचा भावही जपणे आवश्यक आहे. ज्ञान आणि करुणेचा संगम झाल्यास जीवनात यशस्वी व्हाल, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
देशाची आरोग्यसेवा सशक्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर – केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव
आधुनिक काळात जगभरातील लोक तणावमुक्त तसेच आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करण्याचे साधन म्हणून आयुष पद्धतींचा अवलंब करीत आहेत. ही पद्धती आधुनिक चिकित्सा पद्धतीसह एकीकृत करण्याच्या दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. सर्व आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुष विभागही स्थापन करण्यात आले असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.महाराष्ट्रातही येथील कुशल नेतृत्वाच्या मार्गदर्शनात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याच्या दिशेने अत्यंत उल्लेखनीय कार्य होत आहे. आजच्या दीक्षान्त समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ पदवीच प्राप्त करीत नाहीत, तर एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येत आहे. देशाची आरोग्य सेवा सशक्त करण्याची जबाबदारीही या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे, याकडे केंद्रीय मंत्री श्री. जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
२१० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात विविध कोर्सेमध्ये अव्वल आलेल्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदवीप्रदान करण्यात आली. त्यानंतर दीक्षान्त समारंभात एकूण 210 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या गौरवार्थ पदव्या व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये 129 एमबीबीएस, 29 एमडी/एमएस, 35 बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग, 5 एम.एस्सी. आणि 12 संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे.