पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी एका वकिलासह त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव पूनम मुन (वय ३५) असे असून त्या गेल्या साडेतीन वर्षांपासून संबंधित वकिलाच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. आरोपी वकील आणि पूनम यांच्यात संबंध असल्याचा संशय वकिलाच्या पत्नीला होता. या संशयातून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या दिवशी पूनम नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्यानंतर दुपारपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. संध्याकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, कार्यालयातच आरोपी वकील, त्याची पत्नी आणि मुलीने मिळून पूनम यांना मारहाण केली. त्यांच्या हातपाय बांधून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर मृतदेह पोत्यात भरून कार्यालयातच लपवून ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोपींचा विचार होता. मात्र, महिलेचे पती पत्नीचा शोध घेत कार्यालयात पोहोचले असता त्यांना संशयास्पद पोते आढळले. ते उघडून पाहिल्यावर आत पूनम यांचा मृतदेह असल्याचे उघड झाले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.