नाशिक : शहरातील एका तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तंजीर इनामदार या संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत विविध ठिकाणी नेले. त्या दरम्यान तिला जबरदस्तीने मद्य व सिगारेटचे सेवन करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. तसेच, ती शुद्धीत नसताना तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील धार्मिक दोरा काढून तिच्या धार्मिक भावनांचा अवमान केल्याचा आरोप आहे. तसेच विशिष्ट धार्मिक पद्धती स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याचेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय, आरोपीने तरुणीचे काही आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या दबावाखाली तिला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने संबंध ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने अशाच प्रकारे इतर काही मुलींनाही फसवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूपात केला जात असून इतर संभाव्य पीडितांचा शोध घेतला जात आहे.
न्यायालयीन युक्तिवाद :
सरकारी पक्षाने आरोपीची पोलिस कोठडी मागताना त्याने तरुणीला फसवून अत्याचार केल्याचा आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा मुद्दा मांडला. तसेच, त्याच्या आर्थिक स्त्रोतांचा आणि संभाव्य साथीदारांचा तपास करण्याची गरज असल्याचे सांगितले.
दुसरीकडे, बचाव पक्षाने दोघेही एकमेकांच्या संमतीने संबंधात असल्याचा दावा केला. तसेच, तक्रार दाखल करण्यात झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित करत पोलिस कोठडीची गरज नसल्याचे म्हटले.दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.