मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी मोठा अडथळा निर्माण झाला. डोंबिवली स्थानकाजवळ एक रिकामी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. ही घटना सकाळच्या गर्दीच्या वेळी घडल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला.
सुदैवाने संबंधित लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला असून अनेक लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. काही गाड्या ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान थांबून असल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून काही वेळ लागू शकतो. त्यामुळे आजचा संपूर्ण वेळापत्रक बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, पनवेल रेल्वे स्थानक येथेही सकाळी आणखी एक घटना घडली. फलाट क्रमांक 7 वरील पहिल्या मजल्यावरील लिफ्ट अचानक कोसळली. त्या वेळी लिफ्टमध्ये चार प्रवासी होते. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून कोणतीही दुखापत झालेली नाही.दोन्ही घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.