सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद

डिजिटल पुणे    20-04-2026 11:40:57

मुंबई : शहरातील एलपीजी गॅसच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने १८ एप्रिल रोजी राबविलेल्या विशेष धाड मोहिमेत  डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या कारवाईत चेंबुर आणि अनुशक्तीनगर (देवनार) परिसरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई  चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार, उपनियंत्रक शिधावाटप ‘ई’ परिमंडळ श्रीमती रिना बसैय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक नियंत्रक शिधावाटप रामकृष्ण कांबळे यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही कारवाई केली. एलपीजी गॅसचा काळाबाजार व अनियमितता रोखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

चेंबुरमधील कारवाई

चेंबूर परिसरातील पेस्तमसागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ३३ ‘ई’ चेंबुर येथील सहाय्यक शिधावाटप अधिकारी  जितेंद्र देशमुख,  अमर सकपाळ तसेच निरीक्षक भगवान वांडेकर, निलकंठ येसने आणि प्रकाश पराते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान एकूण ८ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल अवैधरित्या प्राप्त करून वापरत असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे २५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिळकनगर (चेंबूर) पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवनारमधील कारवाई 

देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ४९ ‘ई’ अनुशक्तीनगर येथील शिधावाटप अधिकारी  जगन्नाथ सानप, सहाय्यक अधिकारी श्रीमती सोनाली धांदरणेकर तसेच निरीक्षक देवयानी पवार, नंदिनी इंगोले, राकेश पाटील आणि सुनील आढाऊकर यांच्या पथकाने कारवाई केली. येथे एकूण १९ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल वापरात असल्याचे आढळून आले. सुमारे ४९,११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काळाबाजाराविरोधात कारवाई तीव्र

नागरी पुरवठा विभागाकडून एलपीजी गॅसच्या बेकायदेशीर साठवणूक व वापराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती