पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पुण्यातून दिंडीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. या प्रवासादरम्यान वारकरी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने व्यापक नियोजन सुरू केले असून महापौर मंजुषा नागपुरे यांनी यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली.
महापालिकेत आयोजित या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी तसेच मार्गावरील आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
बैठकीत प्रामुख्याने रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता, स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथके, फिरती शौचालये, कचरा व्यवस्थापन, तसेच अखंडित वीजपुरवठा या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आरोग्य पथके, आपत्कालीन सेवा आणि वाहतूक व्यवस्थापन यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, “वारी हा महाराष्ट्राच्या भक्तीचा आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहे. लाखो वारकरी पुण्यातून मार्गक्रमण करत असताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही आपली जबाबदारी आहे. प्रशासनाने सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून काम करावे आणि प्रत्येक सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्यावी.”

तसेच, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता आणि आरोग्य सेवा यावर विशेष भर देत, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.वारीचा हा पवित्र सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पुणे महापालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले