सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 DIGITAL PUNE NEWS

महिला आरक्षण 2029 पासून लागू होणार; जनमताच्या जोरावर विरोधकांना धडा शिकवू – देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    20-04-2026 13:20:00

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार टीका करत 2029 पासून हे आरक्षण निश्चितपणे लागू होईल, असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेत विधेयकाला पाठिंबा न मिळाल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

फडणवीस म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून काही पक्षांनी महिलांविरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. समाजसुधारकांच्या विचारांना छेद देत लोकशाहीतील महिलांच्या सहभागाला धक्का दिला गेला, असा आरोप त्यांनी केला.

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि जनगणनेच्या प्रक्रियेमुळेच महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029 पर्यंत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 2023 च्या घटनादुरुस्तीनुसार ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांना खुलं आव्हान देत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने खुल्या चर्चेला यावे. मात्र, विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्याने ते टाळाटाळ करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

महिलांना संघटित करण्यासाठी राज्यभरातून 1 कोटी सह्या गोळा करण्याचा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जनजागृतीद्वारे महिला आरक्षणाला व्यापक पाठिंबा मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, चुकीची माहिती पसरवण्याची त्यांची सवय आहे. तसेच, महिला प्रतिनिधित्वाबाबत पूर्वी गांभीर्य न दाखवणाऱ्यांकडून आता विरोध होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, प्रियांका गांधी नव्याने राजकारणात आल्या असल्याने त्यांना विधेयकाच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती नसावी, असेही त्यांनी सांगितले. महिला आरक्षण लागू होईपर्यंत प्रयत्न सुरूच ठेवणार, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती