पिंपरी-चिंचवड : १२व्या शतकातील महान समाजसुधारक, समता नायक आणि जगतिक लोकशाहीचे जनक म्हणून ओळखले जाणारे महात्मा बसवेश्वरयांची ८९५ वी जयंती आज पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि 'शिवा अखिल भारतीय युवक संघटना' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजतापिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारत येथे करण्यात आली. यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच कर्नाटक राज्यातील बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानंतर पीसीएमसी मुख्य इमारतीपासून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमात उमाकांत आप्पा शेटे, अनिल बोचरे, सोमनाथ धोंडे आणि सूर्यकांत हिपरगे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.ही रॅली महात्मा बसवेश्वर पुतळा, निगडी येथे पोहोचली. रॅलीदरम्यान “जय शिवा” आणि “महात्मा बसवेश्वर महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमातून महात्मा बसवेश्वर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि बंधुभावाच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.कार्यक्रमाचा समारोप पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन करून करण्यात आला.