सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 शहर

पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी; पुणे-जबलपूर रेल्वेही होणार नियमित - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

डिजिटल पुणे    20-04-2026 17:39:44

​पुणे : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन 'अमृत भारत' रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून या संदर्भातील अधिकृत मंजुरी कळवली आहे.

​पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी, वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून मंत्री मोहोळ यांनी हडपसर ते बनारस दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत 'अमृत भारत' या आधुनिक रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असून, यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल.

​मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या गाड्यांच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेचे अर्थकारण या दोन्ही बाबी रेल्वे मंत्रालयाला पटवून देण्यात मोहोळ यांना यश आले. या गाड्यांमुळे फक्त पर्यटनच नाही तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, त्यामुळे आगामी सुट्ट्यांच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पुणे-जबलपूर गाडी आता नियमित स्वरूपात धावणार

​दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. यापुढे ही गाडी गाडी संख्या २०१६१/२०१६२ 'पुणे-जबलपूर एक्सप्रेस' म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीट दरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती. अमृत भारत एक्सप्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विकासाच्या या कामात नेहमीच सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचा मी पुणेकरांच्या वतीने आभारी आहे. पुणेकरांच्या सुविधेसाठीचा आमचा हा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री


 Give Feedback



 जाहिराती