मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या विकासाला चालना देणारे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे चार प्रमुख निर्णय सरकारने जाहीर केले आहेत.
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण 2026’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार असून बायोगॅस प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि हायब्रिड अन्युईटी मॉडेलवर राबवले जाणार आहेत. चालू वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे घनकचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन होऊन हरितगृह वायू उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमानुसार मूळ वेतन देण्यात येणार आहे. तसेच या शिक्षकांना भविष्यातील शासकीय भरती प्रक्रियेत अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे.
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी 42.55 हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरात आयटी क्षेत्राला गती मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, जमीन धारणा नियमांमध्ये बदल करत भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे.
दरम्यान, मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय चे नाव बदलण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रुग्णालयाचे नाव “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे करण्याची मागणी करत महापालिकेला पत्र पाठवले आहे. या प्रस्तावावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.