पिंपरी-चिंचवड: निगडी परिसरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर ठगांनी एका तरुणाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल २७ तास भीती आणि दबावाखाली ठेवून १२ लाख रुपये उकळण्याचा डाव रचला गेला होता. मात्र, घरातील ज्येष्ठांच्या सतर्कतेमुळे ही मोठी फसवणूक टळली.
रविवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल करून स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवले. संबंधित तरुणाच्या नावावर संशयास्पद पार्सल पकडल्याचे सांगत त्यात पासपोर्ट आणि अमली पदार्थ असल्याचा बनाव करण्यात आला. यामुळे तरुणाला घाबरवून पुढील कारवाईसाठी तयार करण्यात आले.
यानंतर त्याला ‘सिग्नल’ अॅप डाउनलोड करायला लावून व्हिडिओ कॉलवर कथित चौकशी सुरू करण्यात आली. कॉलदरम्यान पोलिस असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींनी ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे सांगत कोणालाही माहिती देऊ नये, अशी धमकी दिली. या कालावधीत तरुणाकडून बँक खात्याचे आणि आधारकार्डचे तपशील मिळवण्यात आले. तसेच ‘क्लिअरन्स’साठी पैसे भरण्याचा दबाव टाकण्यात आला. भीतीमुळे तरुणाने म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची तयारी केली होती.
दरम्यान, तरुणाने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ निगडी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पीडित कुटुंबाला योग्य मार्गदर्शन केले आणि संपूर्ण प्रकार उघड केला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही अधिकृत प्रक्रिया अस्तित्वात नाही. कोणताही अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही. अशा प्रकारचे फोन किंवा संदेश आल्यास घाबरू नये, त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा. तसेच सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठी १९३० या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.