बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मतदान करू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागे प्रकृती बिघडणे आणि प्रवासातील अडथळे हे प्रमुख कारण असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदारांनाही मतदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनीही मतदान करून माध्यमांशी संवाद साधला.
सुळे म्हणाल्या की, “शरद पवारांची तब्येत आता सुधारते आहे. त्यांना मतदानासाठी बारामतीत यायचं होतं, मात्र एक्सप्रेस-वे बंद असल्याने आणि तीव्र उष्णतेमुळे प्रवास कठीण झाला. हेलिकॉप्टरने येण्याचाही पर्याय उपलब्ध नव्हता, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.”
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला देत बाहेर प्रवास टाळण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे त्यांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
आपल्या निवेदनात पवार यांनी 1967 पासून मतदानाचा परंपरागत हक्क बजावत आल्याचं सांगत, यंदा मात्र परिस्थितीमुळे ते शक्य नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत मतदारांना त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.या पार्श्वभूमीवर बारामतीतील ही पोटनिवडणूक भावनिक वातावरणात पार पडत असून, मतदारांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.