सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 DIGITAL PUNE NEWS

बारामती पोटनिवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ चर्चेवर श्रीनिवास पवार नाराज; “आज अशा वक्तव्याची गरज नव्हती”

डिजिटल पुणे    23-04-2026 12:44:16

बारामती :बारामतीत सुरू असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान २०२९ च्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी भविष्यात ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर, श्रीनिवास पवार यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी २०२९ मध्ये बारामतीत कुटुंबातीलच लढत होऊ शकते, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पवार म्हणाले की, सध्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा सुरू असताना अशा प्रकारची चर्चा करणे योग्य नाही. “अजून तीन वर्षांचा मोठा कालावधी आहे. आजच्या दिवशी अशा गोष्टी बोलण्याची गरज नव्हती,” असे त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, जर लोकांना कुटुंबातील संघर्ष नको असेल, तर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढणे शक्य आहे. “भाजपला दोष देण्यात अर्थ नाही. परिस्थिती समजत असताना असे वक्तव्य करणे चुकीचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

श्रीनिवास पवार यांनी हेही नमूद केले की, पक्ष आणि कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय पारंपरिकपणे शरद पवार यांच्या सल्ल्याने घेतले जातात. “साहेबांना विचारल्याशिवाय अशी विधाने करण्यात आली. त्यांच्या तब्येतीमुळे ते सध्या सक्रिय नसले तरी ते यावर बोलतील,” असेही त्यांनी म्हटले.

रोहित पवारांच्या बारामतीतील वाढलेल्या दौऱ्यांबाबत विचारले असता, “त्यांची भूमिका आणि पुढील निर्णय काळच ठरवेल. मतदारसंघाची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने दौरे वाढले असावेत,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, सध्या बारामतीत सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती