मुंबई : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून ती जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी’ अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम’ प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘वसुंधरा रक्षक’ अभियानाच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह कोकाकोला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.‘वसुंधरा रक्षक’ या संकल्पनेला मातृत्वाची जोड देत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, वसुंधरा म्हणजे केवळ पृथ्वी नव्हे, तर आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागतील.
‘वसुंधरा रक्षक’ अभियानाच्या माध्यमातून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार केले जाणार आहेत. गावागावांत, वॉर्डावॉर्डात ही चळवळ पोहोचली पाहिजे. हे रक्षक प्रदूषणाविरुद्ध लढतील. प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, कचरा वर्गीकरण करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा कृतींमधून आपला वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.प्रदूषणाचा परिणाम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची तीव्रता जाणवत नाही. लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून बदलाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगून, आजच्या पिढीला पर्यावरणातील बदल समजावून सांगण्यासाठी ‘आज-काल-उद्या’ या संकल्पनेवर आधारित माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. आजची पिढी तंत्रज्ञानात पुढे असली तरी पर्यावरणाची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. पुढील पिढीला संपत्ती नव्हे, तर स्वच्छ हवा आणि पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.
‘महा-आरपीईटी’ अभियानाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर देत ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिथिंक’ या तत्त्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अनावश्यक पॅकेजिंग कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यांचा उत्पादकांकडून पुनर्वापर करण्याची संकल्पना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम’बाबत मंत्री मुंडे यांनी सांगितले की, कार्बन ट्रेडिंगप्रमाणेच सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन नियंत्रणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उद्योगांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.
वसुंधरा रक्षक व्हॉट्सअॅप कम्युनिटीमुळे तरुणांपर्यंत संदेश प्रभावीपणे पोहोचेल — सिद्धेश कदम
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले की, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमातून होत आहे. ‘वसुंधरा रक्षक’ व्हॉट्सअॅप कम्युनिटीसारख्या उपक्रमांमुळे विशेषतः तरुणांपर्यंत पर्यावरणविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचवला जाईल.
‘महा-आरपीईटी’ धोरणांतर्गत उत्पादकांनी स्वतः निर्माण केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणे ही महत्त्वाची पायरी आहे. हा उपक्रम देशातच नव्हे तर जगातही आगळावेगळा असल्याचे त्यांनी नमूद केले.देशातील पहिली सल्फर डायऑक्साइड ‘इमिशन ट्रेडिंग’ योजना महाराष्ट्रात सुरू होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यातील सुमारे १०० उद्योग या प्लॅटफॉर्मवर सहभागी झाले असून भविष्यात याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संरक्षणासाठी डेटा व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा वापर पुढील काळात करण्यात येणार आहे. प्रशासनासोबतच उत्पादक आणि नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविकात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी सांगितले की, जागतिक वसुंधरा दिन हा केवळ निसर्गाशी संबंधित विषय नसून तो सार्वजनिक आरोग्य, जीवनमान, शाश्वत विकास आणि पुढील पिढीच्या भवितव्याशी थेट संबंधित आहे. आजचा दिवस आपल्याला थांबून विचार करण्याची आणि अधिक हरित व जबाबदार भविष्यासाठी आपली बांधिलकी दृढ करण्याची संधी देतो.
‘महा-आरपीईटी’ अभियान हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. ‘वसुंधरा रक्षक’ उपक्रमाद्वारे विद्यार्थी, तरुण, महिला आणि नागरिकांना शाश्वत जीवनशैलीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.‘अवर पॉवर, अवर प्लॅनेट’ या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरण संरक्षणाची खरी ताकद केवळ धोरणांत नसून नागरिक, संस्था आणि समाजाच्या दैनंदिन निर्णयांमध्ये दडलेली असल्याचे स्पष्ट केले.
वसुंधरा रक्षक व्हॉट्सअॅप कम्युनिटीची सुरुवात
वसुंधरा रक्षक अभियानांतर्गत ‘वसुंधरा रक्षक’ व्हॉट्सअॅप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. या कम्युनिटीद्वारे नागरिकांना या अभियानात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमात क्यूआर कोडच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सचिव जयश्री भोज यांनी या कम्युनिटीमध्ये सहभागी होत ‘वसुंधरा रक्षक’ झाल्याची नोंद केली.या अभियानाच्या लिंक व क्यूआर कोडद्वारे सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.संजय भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले, तर वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी स्वागत केले.