पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक येथे भरवला जाणारा आठवडे बाजार प्रशासनाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून या बाजारामुळे वडगाव बुद्रुक, माणिकबाग आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या अडचणी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.आठवडे बाजार बंद केल्यानंतर परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खरेदी करताना विक्रेत्याकडे पुणे महापालिकेचे वैध परवाना आहे का, याची खात्री करण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
अनधिकृत व्यवसाय करताना किंवा सरकारी कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.