पुणे : पुण्यातील युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस यांनी ‘SAIYAM: The Status of Vulnerability to Addiction’ हा महत्त्वपूर्ण अहवाल जाहीर केला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, तरुणांच्या व्यसनांकडे झुकण्यामागील कारणांचा वेध या अहवालातून घेण्यात आला आहे.
या अभ्यासासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात आले. विशेषतः १० ते २२ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, डिजिटल व्यसन, सोशल मीडिया वापर, ताणतणाव आणि सामाजिक वातावरण यांचा तरुणांच्या वर्तनावर कसा परिणाम होतो, याचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे.

अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष :
अनेक विद्यार्थ्यांमध्ये दररोज किमान एक तास मोबाईल वापराचे प्रमाण आढळले
सुमारे ४०% विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू वापराचे प्रमाण दिसून आले
डिजिटल व्यसनाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळली
२०-२२ वयोगटातील युवकांमध्ये स्क्रीन टाइम ३ ते ६ तासांपर्यंत
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा, कुटुंब आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.”
या अहवालाच्या आधारे पुढील काळात शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा तसेच समुपदेशन उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य यावर विशेष भर देत, युवकांना सकारात्मक मार्गावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.