बारामती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 12 मे रोजी मतदान होणार असून प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी जय पवार यांना संधी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. जय पवार हे युवा आणि विश्वासार्ह नेतृत्व असून ते अजित पवारांची उणीव भरून काढू शकतात, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला.
मिटकरी म्हणाले की, पक्ष विस्तारासाठी नव्या आणि दमदार चेहऱ्यांची गरज आहे. जय पवार यांच्यात नेतृत्वाची क्षमता असून ते भविष्यात पक्षासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. काहींना हा निर्णय घराणेशाही वाटेल, मात्र पक्षाच्या दृष्टीने तो योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असून नव्या सदस्यांची निवड होणार आहे. एका उमेदवारासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला 8 जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला एक जागा सहज मिळू शकते. दुसऱ्या जागेसाठी मात्र त्यांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल असून 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.