मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट करत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी किमान मराठी येणं आवश्यक असून, अन्यथा महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी ठणकावलं.
सरकारकडून 1 मेपासून लागू होणाऱ्या मराठी सक्तीच्या निर्णयाला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात जनजागृती मोहीम राबवली जाणार असून थेट कारवाई टाळली जाईल. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.मीरा-भाईंदर परिसरातील 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परिवहन विभागाने यासंदर्भात सर्व प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.
सरनाईक यांनी सांगितलं की, चालकांनी प्रवाशांशी साधा संवाद साधता येईल इतकी मराठी शिकणं अपेक्षित आहे. “पीएचडी किंवा उच्च शिक्षणाची गरज नाही, पण प्रवाशांना समजेल आणि त्यांचं बोलणं कळेल इतकं मराठी येणं गरजेचं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.तसेच, कोणत्याही दबावाला न जुमानता ही मोहीम पुढे सुरू राहणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.