पुणे : कर्वेनगर परिसरात बसविण्यात आलेल्या ‘वॉटर एटीएम’मधून मिळणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवार व शुक्रवारच्या पाणीपुरवठा बंदमुळे नागरिक त्रस्त असताना, अवघ्या १ रुपयात १ लिटर पाणी मिळत असल्याने विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होत होती. मात्र, या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर मनपाकडे तक्रार करण्यात आली.
तक्रारीनंतर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीस पाठवले असता संबंधित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला. तरीही, आजही विद्यार्थ्यांकडून हे पाणी विकत घेतले जात असल्याचे आढळून आले. काही विद्यार्थ्यांनी “५ रुपयांत १० लिटर पाणी मिळते, त्यामुळे ते दिवसभरासाठी उपयोगी ठरते,” असे सांगितले.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिण्यास अयोग्य पाणी विक्रीस ठेवणे कायदेशीर आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, अशा ठिकाणी कोणताही इशारा फलक नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका होत आहे.
शहरात अशा प्रकारचे किती ‘वॉटर एटीएम’ सुरू आहेत आणि त्यांना मनपाची अधिकृत परवानगी आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून दूषित पाण्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.