सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

दासबोध जयंतीनिमित्त आयोजित सुलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात ;समर्थांच्या ज्ञानोपासक चळवळीचे सामर्थ्य दाखविण्याची आज गरज:मनीषाताई बाठे

डिजिटल पुणे    30-04-2026 11:01:32

 पुणे : श्री रामदासस्वामी संस्थान,सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. भावे स्कुल येथे दि.२९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी  पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदासी  वाङ्मयाच्या  संशोधिका-लेखिका  मनीषाताई  बाठे या होत्या.दासबोध जयंतीनिमित्त  सज्जनगड संप्रदाय अधिकारी सु.ग.स्वामी यांच्या मार्गदर्शनामध्ये शैलेश जोशी यांनी सुलेखन स्पर्धेचा उपक्रम हा ३४  शाळांतील २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून यशस्वीपणे पूर्ण केला.स्पर्धेतील विजेत्यांना, शिक्षक आणि शाळांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. शैलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.सौ. पल्लवी जोशी यांनी आभार मानले.श्री रामदास स्वामी संस्थानचे प्रतिनिधी कौस्तुभ जोशी,मधुरा वाघ,मृणाल ब्रह्मे,योगिनी गोखले आणि विद्यार्थी,शिक्षक,पालक उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मनीषाताई  बाठे यांनी रामदासी परंपरेतील विचारांचे महत्त्व आणि तरुण पिढीने या परंपरेशी जोडले जाण्याची गरज अधोरेखित केली.त्या म्हणाल्या,'समर्थ रामदास यांनी सुंदर व शुद्ध लेखन पद्धतींचा विचार मांडला आहे. त्यांनी सांप्रदायाच्या ज्ञानमार्गी रचनेत भारतातील अनेक पंथ,सांप्रदायिकांच्या ग्रंथाभ्यासाचा पायंडा घालून दिला आहे.त्यामुळे आज रामदासी दफ्तरात दासबोधाच्या बरोबरीने ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत,जगद्गुरू तुकारामांची गाथेच्या अनेक प्रती व अनेक वारकरी संतांच्या अभंगांचा साठा आढळतो.समर्थांच्या त्या ज्ञानोपासक साक्षेपी संघटनाचा प्रत्यय आजही आठ राज्यांतून १३५ मठांतून येतो.या योगदानाचा उपयोग करून आता समर्थांच्या ज्ञानोपासक चळवळीचे सामर्थ्य दाखविण्याची आज गरज आहे'.

योगेश सोमण यांनी सुलेखन स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले,'चांगले हस्ताक्षर हा व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.त्यासाठी परिश्रम केले पाहिजे.आपल्या कारकिर्दीत चांगल्या अक्षराचा फायदाच होतो.चांगल्या हस्ताक्षरातून व्यक्त व्हायला शिकले पाहिजे.अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्यक्त झाला पाहिजे.सुलेखनाचा सराव करून त्यात प्रगत आणि उन्नत झाले पाहिजे'.


 Give Feedback



 जाहिराती