मुंबई : मुंबईतील सायन–पनवेल महामार्गावर मानखुर्द परिसरात घडलेल्या क्रेन दुर्घटनेमुळे मंगळवार रात्रीपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. अवघ्या १२ ते १५ मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल ५ ते ६ तास अडकून पडावे लागले. या घटनेमुळे विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला.
माहितीनुसार, मानखुर्द येथे सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामादरम्यान मोठी क्रेन अचानक कोसळली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेली क्रेन हटवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले; मात्र जड यंत्रसामग्रीमुळे रस्ता काही काळ पूर्णपणे बंद ठेवावा लागला. परिणामी, आधीच अरुंद झालेल्या मार्गावर प्रचंड कोंडी झाली.
या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेकांकडे पिण्याचे पाणी नव्हते, तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवासी तासनतास गाड्यांमध्येच अडकून पडले. मधुमेहासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी टॉयलेट किंवा अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली.
कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योग्य पर्यायी मार्ग किंवा पूर्वतयारी नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्यांनाही या कोंडीचा फटका बसला. पुण्याकडे प्रवास करत असताना त्या सुमारे पाच तास मानखुर्द येथे अडकल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
अखेर बुधवारी रात्री उशिरा क्रेन हटवण्यात यश आले आणि त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.