सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

महा डायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण ;किडनी विकारग्रस्तांना दिलासा

डिजिटल पुणे    30-04-2026 14:37:18

मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलिसीस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र दिनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १२ नवीन केंद्रांचे लोकार्पण होणार असून, त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.

‘महाडायलिसीस’ योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध आहेत. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसीस तंत्रज्ञ, नर्सेस व सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून, नेफ्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जात आहे. तसेच रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला यांसारख्या सेवा रुग्णांना पूर्णतः मोफत दिल्या जातात.

ही योजना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या संस्थेमार्फत राबवली जात असून, सर्व केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे. ‘महाडायलिसीस’ योजनेमुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार व मोफत सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे.


 Give Feedback



 जाहिराती