मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच जोरदार चर्चेत आला आहे. अद्याप थिएटरमध्ये रिलीज न झालेल्या या चित्रपटाने नॉन-थियेट्रिकल हक्कांमधून तब्बल 193 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलीजपूर्वीच फायदेशीर ठरल्याचं चित्र दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे ओटीटी हक्क सुमारे 95 कोटी रुपयांना विकले गेले असून, म्युझिक राइट्समधून 28 कोटींची कमाई झाली आहे. याशिवाय सॅटेलाईट हक्क 70 कोटी रुपयांना निश्चित झाले आहेत. या सर्व व्यवहारांमुळे चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच मोठा आर्थिक टप्पा गाठला आहे.
‘राजा शिवाजी’चा अंदाजे बजेट 120 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात असून, आतापर्यंतच निर्मात्यांना 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा मिळाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे ट्रेड सर्कलमध्ये या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भव्य निर्मितीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काही जणांनी ट्रेलरमधील काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले असले, तरी एकूणच सिनेमाबाबत सकारात्मक वातावरण दिसत आहे.
ट्रेड तज्ज्ञांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर आधीच झालेला व्यवसाय हा चित्रपटाच्या यशाचा मजबूत संकेत मानला जातो. ओटीटी प्लॅटफॉर्म्स, म्युझिक कंपन्या आणि टीव्ही चॅनेल्सचा विश्वास मिळाल्याने ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.हा बहुप्रतिक्षित सिनेमा 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.