पुणे : राज्यात रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबरसारख्या प्रवासी सेवांमध्ये काम करणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडली आहे. पिंपरी-चिंचवड येथील बस आगाराच्या पाहणीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
सरनाईक म्हणाले की, मराठी सक्तीचा नियम नवीन नसून १९८९ पासूनच अस्तित्वात आहे. मात्र, अलीकडे त्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून १ मेपासून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रवासी मराठीत संवाद साधत असताना चालकांना भाषा न समजल्याने वाद निर्माण होतात आणि अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात. हे टाळण्यासाठीच मराठीचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांनी ती शिकण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मराठी साहित्याच्या माध्यमातून भाषा आत्मसात करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषद संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता सरनाईक यांनी सांगितले की, सर्वसामान्य, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा पक्षाचा दृष्टिकोन आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.सरनाईक यांनी शेवटी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे. याबाबत कोणीही संभ्रमात राहू नये.”