सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 DIGITAL PUNE NEWS

मोठी बातमी: बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का 89.79%, पाच वर्षांतील सर्वात कमी निकाल

डिजिटल पुणे    02-05-2026 14:55:57

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 2.09% नी घटला आहे. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात कमी निकाल ठरला आहे.

मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, यंदा कॉपीमुक्त अभियान अधिक काटेकोरपणे राबवण्यात आले. सीसीटीव्ही निरीक्षण, कडक नियोजन आणि गैरप्रकारांवर कारवाई यामुळे निकालावर परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेदरम्यान 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई, तर 15 एफआयआर नोंदवण्यात आले.

यंदाही मुलींनीच निकालात आघाडी कायम ठेवली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का 93.15%, तर मुलांचा 86.80% इतका नोंदवला गेला.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी):

कोकण – 94.14% (अव्वल)

पुणे – 91.25%

मुंबई – 90.08%

अमरावती – 90.92%

नाशिक – 90.72%

कोल्हापूर – 89.97%

नागपूर – 88.67%

छत्रपती संभाजीनगर – 88.68%

लातूर – 84.14% (सर्वात कमी)

एकूण सुमारे 14.58 लाख विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा दिली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली.

निकाल कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 नंतर पाहता येणार आहे. यासाठी सीट नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक आहे. सर्व्हरवरील ताण टाळण्यासाठी विविध वेबसाइट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच DigiLocker अॅपवर डिजिटल गुणपत्रिका मिळणार आहे.

SMS द्वारे निकाल:

वेबसाईट स्लो झाल्यास “MHHSC” असा मेसेज 57766 वर पाठवून निकाल मोबाईलवर मिळवता येईल.

सलग घसरणीचा ट्रेंड कायम:

2022 – 94.22%

2023 – 93.73%

2024 – 93.37%

2025 – 91.88%

2026 – 89.79%

एकूणच, यंदा निकालात घट झाली असली तरी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व कॉपीमुक्त ठेवण्यावर मंडळाने भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती