बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवत इतिहास रचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.यापूर्वी अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेल्या मताधिक्याचा विक्रमही सुनेत्रा पवारांनी मोडीत काढला आहे. मतमोजणीच्या २४व्या फेरीअखेर त्यांचा विजय निश्चित झाला होता.
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना सर्वपक्षीय आणि विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनी कार्यकर्त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम म्हणून विरोधकांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कोणत्याही उमेदवाराला हजार मतेही मिळू शकली नाहीत.याआधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ मध्ये २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मागे टाकत देशात नवा इतिहास घडवला आहे.