मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या पुन्हा नव्या पर्वासह प्रेक्षकांसमोर आला, मात्र यावेळी जुनी लाडकी टीम दिसली नाही. विशेषतः भाऊ कदम आणि निलेश साबळे यांच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना भाऊ कदम यांनी स्पष्ट केलं की, शो बंद झाल्यानंतर काही महिन्यांनी नवीन पर्व सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र या दरम्यान बराच काळ गेला आणि सतत थांबणं शक्य नव्हतं. याच काळात निलेश साबळे यांनीही नव्या पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
भाऊ कदम यांनी सांगितलं की, “निलेश साबळे हा या शोचा मुख्य आधार होता. लेखन आणि दिग्दर्शन त्याच्याकडेच होतं. जर तोच नसणार असेल, तर शोची गुणवत्ता टिकवणं कठीण झालं असतं. त्यामुळे मीही या नव्या पर्वासाठी नकार दिला.”त्यांनी पुढे असंही म्हटलं की, “शो करता आला असता, पण पूर्वी जसं दर्जेदार काम झालं, तसंच कायम ठेवणं महत्त्वाचं होतं. दर्जा कमी झाला असता, तर प्रेक्षकांना तीच मजा मिळाली नसती.”दरम्यान, नव्या पर्वात नवीन टीमसोबत शो सादर केला जात असला तरी, जुन्या टीमची उणीव प्रेक्षकांना जाणवत असल्याचं चित्र आहे.