मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 मे) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीचा निर्णय, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना फायहा होणार असून आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणे, सोलापूरमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सुविधा वाढवणे आणि धाराशिवमधील महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करणे अशा तीन प्रमुख निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ निर्णय
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरावर (इयत्ता 8वी ते 10वी) श्रेणीवाढ करण्यात आली आहे. तसेच 19 माध्यमिक आश्रमशाळांना उच्च माध्यमिक (इयत्ता 11वी-12वी) स्तरावर उन्नती देऊन कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. यामुळे दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती कमी होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयासोबतच नव्या वर्गांसाठी आवश्यक शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 30 शिक्षक आणि 25 कर्मचाऱ्यांची पदे तसेच 19 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 148 शिक्षक पदे निर्माण केली जाणार आहेत.
दरम्यान, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच धाराशिव येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.सरकारच्या या निर्णयांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.