पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही जणांनी गाडी अडवून जबरदस्तीने खाली उतरवलं, स्मशानभूमीजवळ ओढत नेत रिव्हॉल्वर दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एबीपी माझाशी बोलताना विकास लवांडे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात त्यांची प्रवचन सेवा होती. कार्यक्रम संपवून रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ते निघाले असता, तीन ते चार गाड्यांमधून आलेल्या काही जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने खाली उतरवत धक्काबुक्की करण्यात आली.
लवांडे यांनी सांगितले की, या लोकांमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे आणि उरुळी कांचन परिसरातील अक्षय कांचन यांची ओळख पटली, तर इतर काही जण अनोळखी होते. हल्लेखोरांनी त्यांना स्मशानभूमीजवळ नेत रिव्हॉल्वर दाखवली आणि “आवाज करू नकोस, तुझा खात्मा करू” अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर दोन-तीन जणांनी त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या आणि शिवीगाळ करत तेथून पळ काढला.
“आजूबाजूला लोक जमा होऊ लागल्याने माझा जीव वाचला. ड्रायव्हर सोबत असल्यामुळे मी बचावलो, अन्यथा गंभीर प्रकार घडला असता,” असेही लवांडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली असून, संबंधित सर्व आरोपींना अटक होईपर्यंत पोलीस ठाण्यातून न हलण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी हल्ल्याचा निषेध करत वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झुंडशाही होत असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी विकास लवांडे यांच्यावर टीका करत त्यांना “बोगस वारकरी” म्हटलं आहे.
याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. “विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी. अशा प्रकारांमुळे वारकरी संप्रदायाची बदनामी होत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.