पुणे : खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील कट रचणाऱ्या आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-७ पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-७ चे पोलीस अंमलदार नितीन साळवे व प्रशांत कापुरे हे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, लोणगाव परिसरातील आरोपी प्रकाश ऊर्फ बंड्या चरण हा त्याच्या साथीदारांसह फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीकडे खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित कार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेऊन अभिषेक दीपक घनटे उर्फ भाऊजी आणि अनिकेत रामचंद्र चरण या आरोपींनाही अटक केली.पोलिस तपासात आरोपींनी जुन्या वैमनस्यातून खुनाचा कट रचल्याचे उघड झाले. आरोपींकडून सुमारे २.२२ लाख रुपये किमतीचे वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी लोणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.