बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात आनंदाचा क्षण काही क्षणांतच शोकात बदलला. सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांमध्ये, डीजेच्या दणदणाटात आणि वऱ्हाडींच्या उपस्थितीत सुरू असलेल्या विवाहसोहळ्यात कन्यादानाच्या वेळीच वधू पित्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृताचे नाव कुरूमदास कुंडलिक भुतेकर (वय 50) असे असून त्यांनी आपली कन्या नंदिनीचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील प्रदीप नानोटे यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पाडला होता. सर्व धार्मिक विधी, हळदी आणि मंगलाष्टके पूर्ण झाल्यानंतर कन्यादानाच्या क्षणीच त्यांच्या छातीत तीव्र दुखणे सुरू झाले आणि ते अचानक जमिनीवर कोसळले.
उपस्थित नातेवाईकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर लग्नमंडपात काही क्षणांतच आनंदाचा माहोल पूर्णपणे बदलला. नववधूच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असतानाच वडिलांचा अकस्मात अंत झाल्याने उपस्थितांमध्ये शोककळा पसरली.
कुरूमदास भुतेकर हे मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ओळखले जात होते. आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडावे, ही त्यांची इच्छा होती, मात्र नियतीने वेगळाच घाला घातल्याची हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.या हृदयद्रावक घटनेमुळे वरदडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून भुतेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.