पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अशोक खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, “आम्ही त्यांना गुरू मानत होतो, तो केवळ श्रद्धेचा विषय होता,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, 2021 मधील गुवाहाटी दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या की, “अशोक खरात यांचे कुटुंब आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासोबत देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. गुरुसोबत दर्शन घेण्याचा अध्यात्मिक भाव होता.”
त्या पुढे म्हणाल्या की, गुवाहाटीतील फोटोमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. “यापूर्वी आमच्या कुटुंबाने त्या देवीचे दर्शन घेतले नव्हते. त्यामुळे गुरुसोबत दर्शन करण्याची इच्छा होती. आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गुवाहाटीला गेलो आणि तेथे दर्शन घेतले,” अशी माहिती त्यांनी दिली.
याचबरोबर समता पतसंस्थेशी किंवा अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांशी स्वतःचा किंवा त्यांच्या बहिणीचा कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चारही चाकणकरांनी केला. “मला तपास यंत्रणांनी जेव्हा बोलावले तेव्हा मी सहकार्य केले. समता पतसंस्थेत बोगस खाती असल्याची माहिती समोर आली असली, तरी आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एसआयटीने सलग 49 दिवस अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तपासादरम्यान खरातच्या निवासस्थान, कार्यालय आणि फार्महाऊसवर छापे टाकून इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपासातून खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत भाविकांकडून पूजा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच काही महिलांचे शोषण केल्याचेही तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.