केरळ : उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजेच 26 मेच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील 48 तासांत अंदमानमध्ये अनुकूल परिस्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होत आहे. 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 26 मेच्या आसपास तो केरळ किनारपट्टी गाठू शकतो.या काळात तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ईशान्य भारतात जोरदार पावसाचा इशारा
13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 100 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत.
अनेक राज्यांत उष्णतेची लाट कायम
मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बाडमेर येथे 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून देशातील हा सर्वाधिक तापमानाचा भाग ठरला आहे.
कोकणात 6 जूनपर्यंत मान्सूनची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतो. त्यानंतर 6 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर आणि 7 जूनच्या आसपास पुण्यात मान्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनचा प्रवास तुलनेने सुरळीत राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.