नागपूर | पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील रुग्णालयाबाहेर सापडलेल्या संशयास्पद वस्तू प्रकरणात मोठी प्रगती झाली असून महाराष्ट्र एटीएसने संशयित आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आझाद हिंद एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सापळा रचून बसलेल्या एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची नागपूर एटीएस कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे.
पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथील उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी सायंकाळी संशयास्पद वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS), पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले तसेच संशयितांची चौकशीही करण्यात आली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत तो नागपूरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.