मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळताना दिसत आहे. अशातच आता पारंपरिक लग्नसंस्थेला आधुनिक विचारांची जोड देणारा ‘कप बशी’ हा नवा मराठी चित्रपट चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून त्यातील भन्नाट संकल्पना आणि खुसखुशीत संवादांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत आणि नवोदित अभिनेता ऋषी मनोहर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. टीजरमध्ये लग्न जुळवताना नवरा-नवरीऐवजी सासू आणि सुनेची पत्रिका जुळवण्याची अजब अट दाखवण्यात आली आहे. या हटके कल्पनेमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘कप बशी’ या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने केली असून कल्पक सदानंद जोशी यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी केले असून पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले आहेत.
चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी प्रथमच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना उत्तम सिंग यांचे संगीत लाभले आहे.चित्रपटात नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. कौटुंबिक गोंधळ, विनोदी प्रसंग आणि आधुनिक नात्यांवर भाष्य करणारा ‘कप बशी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.