सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
  • हिंजवडीतील ‘थिंकटेक’ फसवणूक प्रकरणात मालक अटकेत; 700 आयटी कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक उघड
 राजकारण

भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर, मोदी इटलीत ‘चॉकलेट डिप्लोमसी’मध्ये व्यस्त; राहुल गांधींचा हल्लाबोल

डिजिटल पुणे    20-05-2026 17:10:22

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावरून काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. देशासमोर बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना पंतप्रधान मात्र इटलीत ‘रिल्स’ आणि चॉकलेट वाटण्यात व्यस्त असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलेडी’ चॉकलेट्स भेट दिल्याचे दिसत आहे. दोन्ही नेत्यांचे हसरे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. “देश आर्थिक अडचणीत सापडत असताना शेतकरी, तरुण, महिला आणि कामगार संकटात आहेत. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे, पण सरकार गंभीर नाही. पंतप्रधान हसत आहेत, व्हिडीओ बनवत आहेत आणि भाजप टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नसून केवळ दिखावा आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

रायबरेली येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचाही उल्लेख करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “देश वाचवण्याची ताकद शेतकरी, मजूर आणि तरुणांमध्ये आहे. मात्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या कमी करून सामान्यांच्या हातातील संधी हिरावून घेतल्या,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच मोदी सरकार संविधानिक संस्थांवर दबाव आणत असल्याचाही दावा राहुल गांधी यांनी केला. “निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. संविधानावर होणाऱ्या या आक्रमणाविरोधात मी आवाज उठवत राहणार,” असे ते म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती