सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
  • हिंजवडीतील ‘थिंकटेक’ फसवणूक प्रकरणात मालक अटकेत; 700 आयटी कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक उघड
 राजकारण

बारामतीत रोहित पवारांचा ‘जनता दरबार’; 2029 च्या राजकीय समीकरणांची रंगू लागली चर्चा

डिजिटल पुणे    23-05-2026 12:08:42

बारामती : रोहित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय सक्रियता वाढवली असून आज आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’मुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी 2029 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोर्चेबांधणी मानली जात आहे.

आज दुपारी 3 वाजता बारामतीतील शारदानगर परिसरातील ‘आप्पासाहेब पवार सभागृह’ येथे हा जनता दरबार पार पडणार आहे. या माध्यमातून रोहित पवार नागरिकांशी थेट संवाद साधणार असून स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

बारामती हा अनेक वर्षांपासून अजित पवार यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात रोहित पवार यांनी बारामतीत वाढवलेली उपस्थिती आणि सातत्याने सुरू असलेले दौरे यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे भविष्यात बारामतीत पवार कुटुंबातीलच नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी 2029 च्या निवडणुकीबाबत भाष्य करताना बारामतीत भविष्यात मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात, असे संकेत दिले होते. त्यानंतर आता आयोजित जनता दरबाराकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरूनही रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी इंधन दरवाढीची तुलना ‘मेलोडी’ चॉकलेटशी करत सरकारवर उपरोधिक निशाणा साधला. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.

राजकीय निरीक्षकांच्या मते, बारामतीतील वाढती सक्रियता आणि जनसंपर्क मोहिमांच्या माध्यमातून रोहित पवार आगामी काळासाठी आपली स्वतंत्र राजकीय ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती