पुणे : आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. देशभरात इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. पेट्रोलच्या दरात सुमारे 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.17 रुपयांची वाढ झाली आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर झाले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पुढे गेले असून डिझेलही 97 रुपयांच्या पुढे पोहोचले आहे.
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ
15 मेपासून सुरू झालेल्या इंधनदरवाढीचा सिलसिला अजूनही कायम आहे.
15 मे रोजी सुमारे 3 रुपयांची वाढ
19 मे रोजी जवळपास 90 पैशांची वाढ
23 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ
आणि आता 25 मे रोजी पुन्हा मोठी वाढयामुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोल तब्बल 7.35 रुपये प्रति लिटरने महागले असून डिझेलमध्येही 7.53 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील आजचे दर
मुंबईत पेट्रोल 111.12 रुपये प्रति लिटर तर डिझेल 97.68 रुपये प्रति लिटर झाले आहे. नागपूरमध्ये पेट्रोल 111.70 रुपये आणि डिझेल 98.76 रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 112.47 रुपये तर डिझेल 99.11 रुपये झाले आहे.
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जळगाव, अमरावती, हिंगोली, रायगड, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, वाशिम आणि नंदुरबारसह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात 2.70 ते 2.80 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
जागतिक बाजारातील वाढत्या किमतींचा परिणाम
जागतिक स्तरावर इंधनाची मागणी वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. युरोप आणि इतर देशांमध्येही पेट्रोलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. हाँगकाँगमध्ये पेट्रोलचे दर जगातील सर्वाधिक मानले जात असून ते भारतीय चलनानुसार जवळपास 300 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत.दरम्यान, सततच्या इंधनदरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.