सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

डिजिटल पुणे    28-05-2026 14:32:09

मुंबई :  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात सुरू असलेल्या ‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या’ नव्या इमारतीच्या बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली, आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी बांधकामाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा :

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि आरामदायी निवास लक्षात घेऊन या वसतिगृहाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे:

प्रवेश क्षमता : या आधुनिक वसतिगृहामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांची (५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी) निवास क्षमता असेल.

खोल्यांची रचना : वसतिगृहात एकूण ३६४ स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मुलांसाठी १८२ आणि मुलींसाठी १८२ खोल्या राखीव आहेत.

 खोलीतील सुविधा : प्रत्येक खोलीत तीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉट आणि कपाटाची सुविधा दिली आहे. तसेच प्रत्येक खोलीला  स्वतंत्र प्रसाधनगृह (अटॅच बाथरूम) जोडण्यात आले असून त्यात गिझरद्वारे गरम पाण्याची सोय असेल.

 इतर सोयी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृह परिसरात सुसज्ज वाचन कक्ष, व्यायामाळा, इनडोअर प्ले एरिया, डबल हाईट कॉमन रूम, वार्डन रूम आणि प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी उत्तम वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हे वसतिगृह मुंबईत शिकणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर ठरेल,असेही मंत्री चंद्रकांत दादा म्हणाले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे, अवर सचिव प्रवीण मुंढे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपकला संचालक विनोद दांडगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि संबंधित उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती