पिंपरी-चिंचवड : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूमकर चौक, ताथवडे आणि पुनावळे येथे तीन अतिरिक्त भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७५ ते ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) याबाबत निर्णय घेतला आहे.
सध्या या भागांमध्ये असलेले अरुंद आणि कमी उंचीचे भुयारी मार्ग वाढत्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दररोज मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सातत्याने वृत्तांकन झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
ताथवडे आणि पुनावळे येथील कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या नव्या भुयारी मार्गांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक विभाग व्यवस्थापक अंकित यादव यांनी सांगितले की, पुणे महापालिका हद्दीत एक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दोन अशा तीन अतिरिक्त भुयारी मार्गांना मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.