उरण : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मंगळवार, २ जून २०२६ रोजी म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम मिन आंग ह्लाइंग यांच्या भेटीचा सन्मान लाभला. या भेटीदरम्यान महामहिम राष्ट्रपती यांच्यासमवेत ६७ सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ उपस्थित होते.जेएनपीएमध्ये आगमनानंतर, म्यानमारच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. आणि जेएनपीएच्या विभागप्रमुखांनी उत्साहपूर्ण व आदरपूर्वक स्वागत केले.
भेटीदरम्यान शिष्टमंडळाला जेएनपीएच्या बंदर पायाभूत सुविधा, कार्यक्षमता, क्षमता विस्तार उपक्रम, धोरणात्मक विकास प्रकल्प, शाश्वतता उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. हा प्रकल्प प्रादेशिक सागरी व्यापार वृद्धीस चालना देणारा आणि देशाच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा विकास टप्पा मानला जात आहे.
यावेळी महामहिम राष्ट्रपती यांनी जेएनपीएने भारतातील क्रमांक एकचे बंदर म्हणून मिळवलेले स्थान हे त्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे आणि सक्षम सेवा क्षमतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या देशातही बंदर विकास उपक्रमांना गती देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच बंदर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेणे, जेएनपीएच्या अनुभवातून शिकणे आणि ज्ञानविनिमय व परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेणे याबाबत शिष्टमंडळाची विशेष उत्सुकता असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. म्हणाले, “म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम मिन आंग ह्लाइंग आणि त्यांच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएमध्ये स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या भेटीमुळे भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमता, जेएनपीएची उत्कृष्ट कार्यक्षमता तसेच वाढवण बंदर प्रकल्पासह भविष्योन्मुख विकास उपक्रम सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली. भारत आणि म्यानमार यांच्यातील सागरी व व्यापारविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि परस्पर प्रगतीस चालना देणाऱ्या नव्या सहकार्याच्या शक्यतांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
यावेळी शिष्टमंडळाने बंदर परिसराला भेट देऊन बंदराची कार्यक्षम कामकाज पद्धती, माल हाताळणी प्रक्रिया तसेच एकात्मिक लॉजिस्टिक्स परिसंस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीद्वारे जेएनपीएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यामधील त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.
व्यापार, संपर्कक्षमता आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्यापक इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारीची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.