सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 राज्य

अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले

डिजीटल पुणे    06-06-2026 11:40:21

नवी दिल्ली : सोशल मीडियावर उपरोधिक राजकीय भाष्यामुळे चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके आज भारतात दाखल झाले. ६ जून रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

दरम्यान, वाढत्या जनचर्चा आणि संभाव्य गर्दीचा विचार करून दीपके यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले घर तात्पुरते रिकामे केल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत यांचे वडील भगवानराव दीपके यांनी हे स्थलांतर कोणत्याही धमकीमुळे नसून खबरदारीचा उपाय असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुलाला आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या ठाम भूमिकेमुळे निर्णय बदलावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील बोस्टन येथे कार्यरत असलेले अभिजीत दीपके हे दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानतळ परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून देशभरात या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.

आंदोलनासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी दीपके यांनी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला आहे. सरोदे यांनीही या वृत्ताला दुजोरा देत, दीपके यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही उद्देश नसून लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

या आंदोलनात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, अभिनेते प्रकाश राज, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र अभिजीत यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेमुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. त्यांच्या आई अनिता दीपके यांनी मुलाने आंदोलनाच्या राजकारणात न पडता अमेरिकेतील व्यावसायिक कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता दिल्लीतील आंदोलनाला प्रशासन आणि नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती