सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 शहर

पुण्यात खराडीतील गॅस गळतीनंतर देवघरातील दिव्यामुळे भीषण स्फोट; आयटी अभियंत्यासह आई-वडिलांचा मृत्यू, पत्नी व मुलगी थोडक्यात बचावल्या

डिजीटल पुणे    06-06-2026 12:50:02

पुणे : खराडी परिसरातील खांदवेनगर येथे गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आयटी अभियंता पांडुरंग गित्ते, त्यांचे वडील विष्णू गित्ते आणि आई वृंदाविनी गित्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पांडुरंग यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी घरातील गॅस सिलिंडर बदलत असताना रेग्युलेटरमधून अचानक गॅस गळती सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू केले. गॅसचा वास संपूर्ण घरात पसरला असतानाच सिलिंडर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हॉलमधील देवघरात पेटलेल्या दिव्याच्या संपर्कात गॅस आल्याने अचानक आग भडकली आणि मोठा स्फोट झाला.

स्फोटानंतर तिघेही गंभीररीत्या भाजल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच प्रथम पांडुरंग गित्ते, त्यानंतर त्यांच्या वडिलांचा आणि काही तासांतच आईचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दुर्घटनेच्या वेळी पांडुरंग यांची पत्नी राजश्री गित्ते या बाथरूममध्ये होत्या. आरडाओरडा ऐकून त्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतानाच स्फोट झाला. त्यामुळे त्या आणि त्यांची मुलगी थोडक्यात बचावल्या.

या भीषण स्फोटामुळे घरातील स्वयंपाकघर, हॉल, खिडक्या, दरवाजे, फर्निचर तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती