पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये पुण्यातील महापौर कार्यालयासह नागपूरमधील काही ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
धमकीचा संदेश मिळताच महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका इमारतीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महानगरपालिका परिसराचा ताबा घेतला असून बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. इमारतीतील प्रत्येक विभाग आणि संवेदनशील ठिकाणांची कसून पाहणी केली जात आहे.
दरम्यान, हा धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. हा प्रकार खोडसाळपणाचा आहे की त्यामागे गंभीर कट रचला गेला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.