सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांविरोधात कायदेशीर एल्गार; रुपाली चाकणकरांचा आशा मिरगेंसह इतरांना इशारा

डिजीटल पुणे    10-06-2026 14:44:45

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माजी अध्यक्षा आशा मिरगे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी आशा मिरगेंना नोटीस बजावली असून, यासंदर्भात स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे.

चाकणकर यांनी सांगितले की, अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा जमिनीच्या व्यवहारांशी आपला संबंध नव्हता. तसेच आपण कोणत्याही महिलेला खरातकडे नेले नसल्याचा दावा त्यांनी केला. कोणताही ठोस पुरावा नसताना आपल्यासह कुटुंबीयांवर अश्लील आणि असभ्य भाषेत आरोप करण्यात आल्याने ही लढाई आता न्यायालयीन पातळीवर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

AI च्या माध्यमातून बदनामीचा आरोप

रुपाली चाकणकर यांनी काही व्यक्तींवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून दिशाभूल करणारे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप केला. खरात यांना इतरांप्रमाणेच आध्यात्मिक गुरु मानत असल्याचे सांगताना, पाद्यपूजेचा व्हिडिओ जुना असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, तपास पारदर्शक व्हावा यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

तीन नोटिसांनंतर न्यायालयात धाव

आशा मिरगे यांनी एका चर्चासत्रात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत ४ एप्रिल रोजी पहिली नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ती स्वीकारण्यात आली नसल्याने पोस्टाद्वारे तीन वेळा नोटीस पाठवण्यात आली. अखेर नोटीस परत आल्यानंतर माझगाव न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

२ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आपणही त्यावेळी न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

"स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याविरोधातील लढा"

"ही केवळ माझी वैयक्तिक लढाई नसून स्त्रीच्या सन्मानासाठीचा संघर्ष आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय महिलांच्या चारित्र्यावर आरोप करण्याच्या विकृत मानसिकतेविरोधात ही भूमिका आहे," असे चाकणकर म्हणाल्या. आशा मिरगेंसह इतर काही महिलांनीही आधारहीन आरोप केल्याचा दावा करत त्यांनाही दिल्ली उच्च न्यायालयातून नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आशा मिरगेंचे आरोप काय होते?

दरम्यान, आशा मिरगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली चाकणकर महिलांना अशोक खरात यांच्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, खरात यांच्याशी संबंधित व्यवहारांमध्ये काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसह रुपाली चाकणकर यांचेही नाव असल्याचा दावा त्यांनी केला होता. चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि सार्वजनिक वावरावरही मिरगे यांनी टीका केली होती.या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, आता या प्रकरणाचा पुढील निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती