पुणे : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची भावना निर्माण झाली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २० जून रोजी दिल्लीत मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, "२० जूनला सर्वांनी दिल्लीला पोहोचायचं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय तिथून मागे हटायचं नाही." विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तडजोड केली जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दीपके यांनी सांगितले की, पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे आणि माझ्यासाठी ही भूमी होम ग्राउंडसारखी आहे. आज संध्याकाळी होणारे आंदोलन शांततापूर्ण असेल. शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार आहे," असे दीपके यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारशी चर्चेसाठी आम्ही तयार आहोत; मात्र आमची सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. "हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे," असे ते म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टी ही केवळ राजकीय संघटना नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीची चळवळ असल्याचा दावा करत, "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत," असा इशाराही अभिजित दीपके यांनी दिला.