सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 विश्लेषण

15 जूनला घरी येणार होते; लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच काळाचा घाला, महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

डिजिटल पुणे    11-06-2026 13:02:12

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. लष्करी तळावर नियमित शस्त्रास्त्र हाताळणीदरम्यान झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात साताऱ्याचे जवान अर्जुन जाधव आणि नवी मुंबईतील विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नियमित प्रक्रियेदरम्यान झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, उरीमधील कमलकोट परिसरातील लष्करी छावणीत शस्त्रास्त्रांची तपासणी आणि हस्तांतरणाची नियमित प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी अचानक हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असलेले अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर दोन्ही जवानांना तातडीने हवाई मार्गाने श्रीनगरमधील बदामीबाग येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

लेकाच्या पहिल्या वाढदिवसासाठी 15 जूनला घरी येणार होते

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र अर्जुन जाधव यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. येत्या 25 जून रोजी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा पहिला वाढदिवस होता. हा खास दिवस कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी त्यांनी 15 जूनपासून सुट्टी घेण्याचे नियोजन केले होते.

मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीला घरात सुरुवात झाली होती. आई-वडील, पत्नी आणि कुटुंबीय अर्जुन यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसांवर आलेली भेट कायमची अपुरी राहिली आणि देशसेवेच्या कर्तव्यात असताना अर्जुन जाधव यांनी वीरमरण पत्करले.

ऐरोलीच्या जवानालाही देशासाठी सर्वोच्च बलिदान

या दुर्घटनेत नवी मुंबईतील ऐरोली येथील जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. धाडसी, कर्तव्यनिष्ठ आणि उत्साही स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये विशेष परिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ऐरोली परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या दोन्ही वीर जवानांना महाराष्ट्रातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम!


 Give Feedback



 जाहिराती