सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
 जिल्हा

प्रशासनाची मदत की नवी संकटे? शेतकऱ्याला मिळालेला बैल पडला आजारी;मदतीसाठी मिळालेला बैल दोन दिवसांतच खाली बसला; उपचाराचा खर्च आता शेतकऱ्याच्या माथी

डिजीटल पुणे    12-06-2026 11:59:31

लातूर : देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादळी पावसादरम्यान वीज कोसळून गायकवाड यांचा बैल दगावल्याने ऐन पेरणीच्या हंगामात त्यांच्यावर संकट कोसळले होते. बैल नसल्याने त्यांच्या पत्नीने स्वतः नांगराला जुंपून शेतीची कामे सुरू ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तातडीने शेतकऱ्याला स्थानिक गोशाळेतून एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र, मदतीच्या उद्देशाने देण्यात आलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत संबंधित बैल आजारी असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यासमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

मदत म्हणून मिळालेल्या बैलाच्या उपचारासाठी आता स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची वेळ गायकवाड कुटुंबावर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने बैल देण्यापूर्वी त्याची आरोग्य तपासणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सक्षम आणि कामासाठी योग्य जनावर उपलब्ध करून देण्याऐवजी घाईघाईत निर्णय घेतल्याचा आरोपही होत आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावरून या घटनेवर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे. "मदतीच्या नावाखाली दिलेला बैल आजारी निघाला आणि त्याच्या उपचाराचा खर्चही शेतकऱ्यालाच करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची सरकारची हीच भूमिका असल्याचे दिसून येते," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीची गुणवत्ता आणि त्यामागील जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मदत म्हणून देण्यात आलेली सुविधा शेतकऱ्यांसाठी नवी अडचण ठरत असेल, तर अशा यंत्रणांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती